महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी

भारताच्या एकावन्न प्रमुख शक्तीपीठांपैकी महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानली जाणारी तुळजाभवानी त्यातील एक आहे. महाराष्ट्रात देवींची एकूण साडेतीन पीठे आहेत. त्यातील हे एक श्रेष्ठ पीठ आहे. हे मंदिर बालाघाट डोंगराच्या एका पठारावर वसले आहे. छत्रपती शिवाजी राजे यांच्या भोसले घराण्याची ती कुलस्वामिनी असल्यामुळे तिला संपूर्ण महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचा मान मिळाला आहे.

मुख्य मंदिरात जाण्यासाठी सुमारे ९० पायऱ्या दोन टप्प्यांनी उतराव्या लागतात. पहिल्या टप्प्याच्या डाव्या हाताला कल्लोळीतीर्थ आहे तर उजव्या हाताला गोमुखतीर्थ लागते. तेथे गणेशतीर्थ, अमृतकुंड इत्यादी तीर्थे आणि सिद्धीविनायक, विठ्ठल, दत्तात्रेय इत्यादी देवतांची मंदिरे आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या पायऱ्या उतरुन गेल्यावर तुळजाभवानीच्या मुख्य मंदिराचा प्राकार दिसू लागतो. प्रांगणात एक मोठे होमकुंड आहे.

त्याच्या समोर दीपमाळा आहेत. मुख्य सभामंडप व मंदिराचा गाभारा हेमाडपंती शैलीचा आहे. मुख्य गाभाऱ्यात अष्टभुजा भवानीची मूर्ती आहे. ही मूर्ती गंडकी’ पाषाणाची आहे. हिच्या हातात उजव्या खालच्या हातापासून बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य आहेत. उजवा पाय महिषासूरावर असून डावा पाय जमिनीवर असून दोन पायांमध्ये तुटलेले महिषमस्तक आहे.

तिच्या शयनाकरिता गाभाऱ्यात शयनगृह व चौपाई आहे. भवानीच्या समोरच भवानी शंकराचे लहानसे मंदिर असून मंदिराच्या मध्यभागी देवीसन्मुख स्फटिकाचा सिंह आहे. हेच देवीचे वाहन होय. या देवीच्या देवस्थानाची निर्मिती कधी झाली व तिला तुळजाभवानी’ हे नांव कसं पडले या संबंधी पुराण कथा आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ऋषी कर्दम ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनुभूती ही यमुनाचल पर्वतावरील वनात आदिशक्तीची तपश्चर्या करत असताना कुकर नावाच्या राक्षसाची तिच्या सौंदर्यावर नजर पडली व तो तिला त्रास देऊ लागला.

अनुभूतीने त्या राक्षसाला न घाबरता, आदिशक्तीचा धावा सुरु करताच आदिशक्ती धावून आली. त्यावेळी दोघांत तुंबळ युद्ध झाले. आपला टिकाव लागणार नाही म्हणून राक्षसाने रेड्याचे (महिष) रुप धारण केले व युद्धास सज झाला. परंतु देवीने त्याचा वध केला. त्यामुळे कुकर दैत्याला महिषासूर’ हे नांव व आदिशक्तीला ‘महिषासूरमर्दिनी’ हे नाव पडले. आदिशक्तीने अनुभूतीला वर मागण्यास सांगितले.

अनुभूतीने जगाच्या कल्याणार्थ तू येथे वास्तव्य करावे असा वर मागितला आणि डोंगरात देवी प्रतिभारुपाने प्रगट झाली. पुराणातील यमुनाचल पर्वत, हाच हल्लीचा बालघाट डोंगर होय. ही देवी अनुभूतीने धावा करताच त्वरेने धावून आली, म्हणून तिला त्वरिता’ म्हणू लागले. त्वरिताचे बोली भाषेत ‘तुरजा’ व तुरज्याचे तुळजा’ झाले. पुढे मंदिराभोवती तुळजापूर शहर निर्माण झाले. या तुळजाभवानीला ‘तुकाई’ पण म्हणतात. तुळजाभवानीच्या मूर्तीची दररोज चार वेळा पूजा होते. वर्षातून तीन वेळा देवीची निद्रा असते. येथील नवरात्र उत्सव आगळा-वेगळा असतो.

कारण तुळजापूरचे ठाण हे शक्तिपीठ असून भवानीची मूर्ती चल आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे एकदा प्रतिष्ठापित करण्यात आलेली मूर्ती पुन्हा हलवता येत नाही. परंतु ही मूर्ती पुन्हा हलवता येते. नवरात्र महोत्सवापूर्वी म्हणजे कृष्णपक्षाच्या कालाष्टमीदिनी तुळजाभवानीची प्रत्यक्ष मूर्ती तिच्या शेजघरात निद्रेसाठी हलविण्यात येते. व घटस्थापनेच्या दिवशी सिंहासनावर आरुढ करण्यात येते. त्यानंतर नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते.

नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव मानला जातो. परंतु येथे पंधरा दिवसांचा उत्सव असतो. नवरात्रीत देवीला विविध अलंकार व पोषाख घालतात. नऊ दिवसांत नित्य महापूजा होते. प्रत्येक रात्री वाहन बदलून देवीचा छबिना काढतात, अश्विन शुद्ध अष्टमी-नवमीला चंडीहोम होतो.

रात्री पलंगाची व पालखीची मिरवणूक काढतात. ही पालखी दसऱ्याच्या दिवशी पहाटे देवीपुढे आणतात. मग देवी पालखीतून शिलंगणाला जाते. सीमोल्लंघनाहून परत आल्यावर देवी शयन करते. या आदिशक्तीचे स्वरुप विराट आहे. भक्तांना वात्सल्यसिंधूवाटणारी तर दुर्जनांचा नाश करणारी, उग्र रुप धारण करणाऱ्या या आदिशक्तीची उपासना वेदकाळापासून चालू आहे.

Leave a Comment