तुमच्या कुळी शिवशंकर अवतार घेईल!

पाच सुलतानी व एक मोंगली अशा सहा सत्तांच्या जाचात अवघा महाराष्ट्र होरपळून निघत असताना वेरुळ व आसपासच्या आठ-नऊ गावांचे बाबाजी भोसले हे पाटील होते. बाबाजी अत्यंत धर्मशील, दानशील, देव-ब्राह्मणपूजक होते. शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव व तुळजापूरची तुळजाभवानी यांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. ईश्वरीकृपेने त्यांना दोन पुत्र झाले. मोठा मालोजी व धाकटा विठोजी.

मालोजीराजे मोठे पुण्यशील होते. त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. ते विद्यासंपन्न होते. वयात आल्यावर आपण काहीतरी पराक्रम करावा; म्हणून लखुजी जाधवराव यांच्या मार्फत दौलताबादच्या बादशहाकडे सरदार झाले. फलटणचे नामवंत सरदार नाईक निंबाळकर यांची कन्या उमा हिच्याशी मालोजींचा विवाह झाला. नोकरीनिमित्त ते वेरुळला राहू लागले. विठोजींना पुत्रसंतान झाले, पण मालोजींना पुत्रसंतान नव्हते; म्हणून उमाबाईने अनेक नवससायास केले. अनष्ठाने केली. नगरच्या पीर शहाशरीफ याला नवस केला. ‘मला पत्र झाला म्हणजे त्याला तुमचे नाव देईन.’ असे वचन दिले. ईश्वर त्यांच्यावर प्रसन्न झाला. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन पुत्र झाले.

एकदा लखुजी जाधवरावांकडे शिमगा सणातील रंगपंचमीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला येण्यासाठी अनेक प्रतिष्ठित मंडळींना निमंत्रण होते. मालोजींनाही निमंत्रण होते. शहाजीला घेऊन मालोजी समारंभाला गेले. शहाजी दिसावयास अत्यंत सुंदर होता. गुणवान होता. जाधवरावांनी शहाजीला आपल्या जवळ बसवून घेतले. त्यांना तो अतिशय आवडत होता. जवळच जाधवरावांची कन्या जिजाऊ बसली होती. त्या वेळी ती तीन वर्षांची होती. जाधवराव सहज हसून गमतीने जिजाऊला म्हणाले, “मुली, तुला हा शहाजी पती म्हणून हवा का? तुमचा जोडा अगदी योग्य वाटतो.”

कदाचित ईश्वरीसंकेतानेच जाधवराव असे बोलून गेले असावेत. त्या समारंभास आलेले सगळे आप्तस्वकीय जाधवरावांचे शब्द ऐकताच अतिशय आनंदित झाले. सगळे जण एकदम म्हणाले, “बरोबर बरोबर! जोडा अगदी योग्य आहे.” हे ऐकताच मालोजी सर्वांना म्हणाले, “जाधवराव काय म्हणाले ते सर्वांनी ऐकले ना? जाधवराव आता आमचे व्याही झाले आहेत.” सर्वांनी होकार दिला, पण जाधवराव काहीच बोलले नाहीत. समारंभ संपला. दुसरे दिवशी जाधवरावांनी सर्वांना भोजनाचे आमंत्रण दिले.

मालोजींनाही निमंत्रण दिले. त्या वेळी मालोजी जाधवरावांना म्हणाले, “आता तुम्ही आम्ही व्याही झालो आहोत, तेव्हा आम्ही लग्नाच्या वेळीच भोजन करू.” जाधवरावांच्या पत्नीला हा सगळा प्रकार समजला. तेव्हा ती जाधवरावांना म्हणाली, “तुम्ही हे काय भलतेच कबूल करून बसलात? आपल्या तोलामोलाच्या घरीच मुलगी द्यावी. भोसले आपल्या तोलामोलाचे आहेत का? ज्यांच्याकडे मोठी दौलत आहे, सोने, नाणे भरपूर आहे, त्यांनाच आपली मुलगी द्यावी. आपण सर्वांदेखत नको ते बोलून बसला हे योग्य नाही.” “मी सहज गंमतीने बोललो होतो. मी वचनात गुंतलो नाही.” जाधवराव म्हणाले.

जाधवरावांनी मालोजींना बोलावून सांगितले, “तुमची आमची सोयरीक होणार नाही. घरी कोणालाही ती पसंत नाही. आता ईश्वरीसंकेत असेल तसेच घडेल.” या उत्तराने मालोजीराजे अगदी निराश झाले. मालोजी आपल्या घरी गेले. त्यांनी देवीची प्रार्थना केली. मालोजी माघातील पौर्णिमेला आपल्या शेतात एकटेच विचार करीत बसले. ‘आपण जाधवरावांच्या तोलामोलाचे नाही. ते आपली मुलगी दुसऱ्याला देणार मग आपला पुरुषार्थ काय राहिला? त्यापेक्षा मरण आले तर बरे.’ असा विचार करीत मालोजी बसले असता देवीने त्यांना प्रत्यक्ष दृष्टान्त देऊन सांगितले, “तुझा शुद्ध भाव पाहून मी तुजवर प्रसन्न झाले आहे.

घाबरू नकोस. दुःख करू नकोस. तुझ्या कुळात प्रत्यक्ष शिवशंकर अंशरूपाने अवतार घेऊन धर्मस्थापना करणार आहे. देवब्राह्मणांना पीडा झाली आहे ती दूर करणार आहे. तुझ्या वंशात अवतारी पुरुष शकको होईल. तो दुष्टदुर्जनांचा संहार करून धर्मरक्षण करेल. तुझ्या वंशात सत्तावीस पुरुष राज्य करतील.” देवीने मालोजींना जवळच असलेले एक वारूळ दाखविले आणि सांगितले, त्या वारुळात भरपूर धन आहे ते घे; त्यामुळे तुझी इच्छा पूर्ण होईल.”

असे सांगून देवी अदृश्य झाली. देवीने दिलेल्या दृष्टान्ताने मालोजींना अतिशय आनंद झाला. त्या आनंदात ते घरी परत जायचेच विसरून गेले. मध्यरात्र झाली तरी मालोजीराजे परत आले नाहीत; म्हणून विठोजीराजे अन्य सेवकांसह रानात गेले. एका झाडाखाली मालोजीराजे बसले होते. विठोजी भेटताच मालोजींनी देवीने दिलेला दृष्टान्त सांगून ते वारूळ दाखविले. दसरे दिवशी मालोजीराजे व विठोजीराजे काही सेवकांसह त्या वारुळाजवळ आले. ते वारूळ उकरले, तो आत भला मोठा नाग होता.

मालोजींनी हात जोडून त्या नागराजाला प्रार्थना केली, “देवीनेच मला येथील धन घेण्यास सांगितले आहे. कृपया, तू आता येथून निघून जा.” नाग निघून गेला. सेवकांनी वारूळ उकरले. आत धनाने तुडूंब भरलेला हंडा मिळाला. देवीनेच दृष्टान्त दिल्यानुसार मालोजींनी ते धन श्रीगोंदे येथील शेषावा नाईक-पुंडे यांच्या घरी नेऊन ठेवले. मालोजींना धन सापडल्याचे ऐकून शेषावा नाईक यांना अतिशय आनंद झाला. मालोजींचा भाग्योदय झाल्याने त्यांना विशेष आनंद झाला. देवीच्या कृपेने मिळालेल्या धनामुळे मालोजींची प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढू लागली.

सगळीकडे त्यांना मानसन्मान मिळू लागला. बादशहाने त्यांना पंचहजारी मनसब केले. ‘राजे’ हा किताब दिला. शिवनेरी, जुन्नर इत्यादी सरंजाम दिला. जाधवरावांपेक्षाही ते अधिक भाग्यवान झाले. देवीने जे धन दिले त्याचा त्यांनी सत्कार्यासाठी उपयोग केला. वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. घृष्णेश्वराच्या कायमच्या पूजेअर्चेची सोय केली. शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या डोंगरावर मोठा तलाव बांधून यात्रेकरूंच्या पाण्याची सोय केली. शिवालयतीर्थ बांधले. स्वत:ची पागा वाढविली. पागेत पाचशे घोडे ठेवले.

एकूण मालोजीराजांचा सगळीकडे दबदबा वाढला. जाधवरावांना व त्यांच्या पत्नीला हे समजले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आता त्यांनी आपली कन्या जिजाऊ शहाजीराजांना देण्याचे आनंदाने मान्य केले. जिजाऊ आणि शहाजी यांचा विवाह मोठ्या थाटात झाला. सासर-माहेरच्या सोन्या-रत्नांच्या अलंकारांनी रत्नतुल्य जिजाऊने भोसल्यांची सून म्हणून पुण्याच्या भोसले वाड्यात पाऊल टाकले आणि पुढे देवीच्या दृष्टान्ताप्रमाणेच सारे घडत गेले.

Leave a Comment