सप्तपुरीपैकी एक उज्जैन (अवंतिका)

उज्जैन म्हणजे पूर्वीची अवंतिका नगरी. सप्तपुरीपैकी एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. पुराणकाळी शंकराने या ठिकाणी त्रिपुरावर विजय मिळवला म्हणून या स्थानाला उज्जैयिनी हे नांव पडले. स्कंद पुराणानुसार भिन्न भिन्न कल्पांमध्ये ही नगरी विविध नावांनी प्रसिद्ध होती. विक्रमराजाला शनिमहाराजांकडून प्रताप मिळाला ती ही नगरी. सांदिपनीकडून श्रीकृष्णाला ज्ञानप्राप्ती झाली तीही नगरी.

कालिका देवीने कालिदासाला काव्याची प्रेरणा दिली तसेच राजा भर्तृहरीला आयुष्याचे रहस्य शिकवले ती ही नगरी अवंतिका. उज्जैन हा जिल्हा मध्यप्रदेश राज्याच्या पश्चिम भागात असून भोपाळपासून १८१ कि. मी. वर आहे. जवळचे विमानतळ इंदोर. इंदोरपासून उज्जैन ५५ कि. मी. अंतरावर आहे. समग्र तीर्थस्थाने देहस्वरुपमानली तर हे नगर नाभिस्थानी आहे. द्वादश ज्योर्तिलिंगांपैकी महाकाल नामक ज्योर्तिलिंग येथे असून ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे.

येथे सतीचे कोपरे गळून पडले म्हणून मूर्तीऐवजी कोपराचीच पूजा करतात. भगवान विष्णूच्या शरीरातून उत्पन्न झालेली क्षिप्रा नदी येथूनच वाहाते. त्यामुळे ही नदी पवित्र मानली जाते. बृहस्पती सिंह राशीत असतांना क्षिप्रा स्नानाचे आगळेवेगळे महत्त्व आहे. महाकाल ज्योर्तिलिंगासंबंधी कथा सांगितली जाते. एक शिवभक्त ब्राह्मण उज्जैन नगरात राहात होता.

या ब्राह्मणाने स्थापन केलेल्या शिवलिंगाचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेल्या दूषण राक्षसाने करावयाचे ठरवले. तेव्हा त्यातूनच भगवान शंकर प्रगट झाले व त्याचा सैनिकासह नि:पात केला. नंतर ब्राह्मणाने शंकराला तेथेच रहाण्याची विनंती केली. ब्राह्मणाच्या विनंतीला मान देऊन शिव-पार्वती त्या लिंगात ज्योतिरुपाने राहिले.

पार्वतीमातेच्या आज्ञेवरुन महादेवाने हे नगर बसवून नगराच्या चारही दिशेला चार संरक्षक द्वारे उभी राहिली असे मानले जाते. त्या चार महाद्वारांच्या रक्षणासाठी चार देव व मध्यभागी महांकालेश्वर, यांची नियुक्ती महादेवाने केली. या चार महाद्वारांची पदयात्रा केली जाते. वैशाखात चारद्वार यात्रा व पंचक्रोश यात्रा करण्याचे माहात्म्य असल्यामुळे भर उन्हात भाविक यात्री यात्रेला येतात.

विक्रमादित्याने हे मंदिर बांधले. दिल्लीच्या सुलतानाने त्याचा नाश करुन संपत्ती लुटून नेली. जेव्हा उज्जैनीचा ताबा राणोजी शिंदे यांनी घेतला, व मंदिर बांधून कोटीतीर्थातले लिंग काढून त्याची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. महाकालेश्वराची शाळका चांदीच्या पत्र्यांनी मढवलेली आहे. तेथे तेलाचा व तुपाचा असे दोन नंदादीप अखंड तेवत असतात.

गाभाऱ्यातील कोनाड्यात गणपती, पार्वती व षडानन यांच्या मूर्ती आहेत. महानदी क्षिप्रेत स्नान करायला मिळणे दुर्लभ होय. ते करुन जो महाकालाला नमस्कार करतो त्याला मृत्यूचे भय राहात नाही. अशा या उज्जैन नगरीत महादेवाची एकूण ८४ मंदिरे आहेत. यात्रेत २८ तीर्थे येतात. ही बहुतेक सर्व क्षिप्रा नदीच्या काठावर आहेत.

Leave a Comment