वज्रबाहू व भद्रायू भेट

शिवयोग्याने सांगितल्याप्रमाणे भद्रायूने रुद्राक्ष धारण केले. अंगाला भस्म फासले. त्याला एक उत्तम बांख दिला व एक शस्त्रही दिले व त्याला आशीर्वाद देऊन तुझी कीर्ती त्रिभुवनात पसरेल असा वरही दिला. इतके बोलून तो शिवयोगी अंतर्धान पावला. मध्यंतरी बराच काळ गेला. ‘दाशार्ण’ देशाचा राजा ‘वज्रबाहू’ हाच खरा ‘सुमती’चा पती होता. त्याच्या राज्यावर शत्रू चालून आला. ‘वज्रबाहू’चा पराभव झाला. त्याच्या पराभवाची बातमी ‘भद्रायू’ला कळली.

‘भद्रायू’ने गुरुस्मरण केले. मृत्युंजय मंत्र म्हटला. स्वतःच्या हाती शस्त्र घेतले आणि आईला नमस्कार करून तो म्हणाला, “मी शत्रूला जिवंत पकडून तुझ्या पायाशी आणतो.” असे म्हणून त्याने पद्माकरशेठचा मुलगा ‘सुनय’ याला बरोबर घेतले आणि तो धावतच निघाला. शत्रुसैन्य ‘वज्रबाहू’ला घेऊन चालले होते. या दोघांनी गर्जना करून शत्रुसैन्याला थांबविले. शत्रूनी त्यांचा आवाज ऐकून मागे बघितले व शत्रुसेना परत वळली.

भद्रायूने आपला शंख वाजवला. त्या दोघांनी शत्रुसेनेशी युद्ध सुरू केले. ते पाहून पराभूत झालेले ‘वज्रबाहू ‘चे सैन्य उत्साहाने शत्रूवर चालून गेले व ‘वज्रबाहू’ला ज्या रथाशी बांधले होते, तेथपर्यंत त्यांनी मजल मारली. ‘भद्रायूवर’ ‘हेमरथ’ चालून गेला. तो फार बलशाली होता. म्हणन भदायक योग्याने दिलेले शस्त्र काढून हेमरथावर उगारले. त्या शस्त्रानेच त्याने हेमरथाला खाली पाडले व आपल्या पित्याला सोडविले.

‘वज्रबाह’ला ते पाहून त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले. तो म्हणाला, “तू मला शत्रूपासून सोडवलेस. तू कोण आहेस? विष्णू आहेस? शंकर आहेस की इंद्र?” भद्रायू म्हणाला, “महाराज, शत्रू पळवून लावून आपण नगरात जाऊया.” नंतर ‘भद्रायू’ने ‘वज्रबाहू’ला सिंहासनावर बसवले व तो म्हणाला, “मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हा मी कोण ते तुम्हाला कळेल.”

‘भद्रायू’ व ‘सुनय’ आपल्या घरी परत गेले. त्यांना शिवयोग्याची आठवण झाली. पण शिवयोगी ‘नैषध’ देशात गेला होता. त्याने भद्रायूचा सर्व वृत्तान्त ‘चित्रांगद’ व ‘सिमंतीनी’ला सांगितला व तो पुढे म्हणाला, “तो तुमचा जावई होण्यास योग्य आहे.” ‘कीर्तिमालिनी’ सुद्धा उपवर झाली होती. चित्रांगदाने मोठ्या थाटाने ‘कीर्तिमालिनी’ व ‘भद्रायू’ यांचे लग्न लावले.

‘वज्रबाहू ‘लाही निमंत्रण होते. तो चकित होऊन ‘भद्राय’कडे पाहू लागला. तेव्हा ‘चित्रांगदा ने ‘वज्रबाहू ला बाजूला घेतले व तो म्हणाला, “हा भद्रायू तुम्ही रोगी म्हणून त्याच्या मातेसह टाकलेला तुमचाच मुलगा आहे.” नंतर चित्रांगदाने ‘वज्रबाहू’ची व ‘सुमती’ची भेट घडविली. ‘भद्रायू’ राजपुत्र आहे हे सर्वांना समजले. ‘भद्रायू’ला राज्य देऊन वज्रबाहू ‘सुमती’सह हिमालयात गेला. ‘भद्रायू’ सुखाने राज्य करू लागला. तो आणि ‘कीर्तिमालिनी’ शिवाची उपासना करू लागले.

Leave a Comment