वाल्याचा झाला वाल्मिकी

रामायण आणि महाभारत हे आपले आद्य पूजनीय, वंदनीय अन् आचरणीय असे ग्रंथ, महर्षी वाल्मिकी हे रामायण ह्या ग्रंथाचे श्रेष्ठ रचनाकार! पण हेच महर्षी वाल्मिकी हे पूर्वाश्रमी कोण होते, माहीत आहे का? एक जंगलात वाटमारी करणारा, लोकांचं धन लुटून घेणारा, प्रतिकार करणाऱ्याला मारणारा असा एक दुष्ट, दुराचारी पापी मनुष्य राहत होता. त्याचं नाव वाल्या.

तो जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारायचा, त्यांचं धन लुटून घ्यायचा व आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा. दुसऱ्याचं धन चोरायचं, त्या निरपराध लोकांना जीवे मारायचे अन् पापाचे रांजण भरायचे; असे काम तो करीत असे. एकदा काय झालं-जंगलाच्या वाटेवर वाटमारी करायला उभा असणाऱ्या वाल्याला कुणीच वाटसरू भेटला नाही.

मात्र अचानकपणे त्याच्या कानावर ‘नारायण…. नारायण’ असे नाम अन् पाठोपाठ वीणेचा झंकार ऐकू आला. आपल्या हातातली कु-हाड सरसावून वाल्या पुढे आला. त्याने नारदांची वाट अडवली. तेव्हा नारद त्याला म्हणाले, “वाल्या!अरे, माझी वाट कशासाठी अडवतोस? अरे बाबा, माझ्याकडे कसलीच संपत्ती नाही, धन नाही; इतकंच काय,पण साधं भिक्षान्न पण नाही. जे रामनामाचे धन माझ्याकडे आहे, त्या धनाचा तुला काहीच उपयोग नाही. तू आपली माझी वाट सोड अन् मला माझ्या मार्गाने जाऊ दे.”

तेव्हा वाल्या म्हणाला, “एऽऽ गोसावड्या! तुला काय वाटलं, मी तुझ्या ह्या नाटकाला फसणार आहे? गप्पपणे जे आहे ते मला दे नाहीतर, उगाच माझ्या हातून मरावे लागेल.” तेव्हा नारद म्हणाले, “वाल्या! अरे, अजून अशा किती माणसांना मारणार आहेस तू? वाल्या तुला दिसत नसले तरी तुझ्या डोक्यावरचे अनेक पापांचे पर्वत हे मला दिसत आहेत. उद्या तुलाच ह्या पापाचा हिशेब द्यावा लागणार आहे. तेव्हा तुझ्या ह्या पापात अन्य कुणीही वाटेकरी होणार नाही. तुझं पाप हे पुढे अनेक यातना, कष्ट, ताप, अन् आस ह्या रूपात तुझे तुलाच भोगावा लागणारआहे.

तुझ्या पापाचे अन्य कुणीही वाटेकरी होणार नाही. जा हवं तर घरी जा अन् आपल्या बायको-मुलांना विचारून ये.” “छान! म्हणजे मी तिकडे जातो अन् तू इकडे पसार हो.” वाल्या म्हणाला. “नाही वाल्या,मी कुठेच जाणार नाही. मी इथेच थांबतो.” नारद म्हणाले. तरी वाल्याला मात्र नारद थांबतीलच, असा विश्वास वाटत नव्हता; म्हणून वाल्याने काय केले? त्याने नारदांना एका झाडाला बांधून ठेवले. तो आपल्या बायकोमुलांना ‘तुम्ही माझ्या पापाचे वाटेकरी होणार का?’ म्हणून त्यांना विचारण्यासाठी घरी गेला.

नारदमुनी आपले नामस्मरणात रंगले. वाल्या घरी गेला. आपल्या डोक्यावर पापांच्या राशी उभ्या राहिल्याचे सांगितले. “हे सारे मी तुमच्या पालनपोषणासाठी करतोय. तेव्हा माझ्या पापाचा कोण आणि किती वाटा घ्याल?” असे त्यांना विचारले. पण त्या वेळी “हे पाहा ! आमचे पालनपोषण करणे, हे कुटुंबप्रमुख ह्या नात्याने तुमचे कर्तव्यच होते अन् आहे. आता ती गोष्ट चांगल्या मार्गानं करायची का वाईट मार्गाने, हा तुमचा प्रश्न आहे; तो आमचा नाही.

आम्ही तुमच्या पापाचे वाटेकरी का अन् कशासाठी व्हायचे असे म्हणून बायको-मुलं ह्यांनी त्या पापाचे वाटेकरी होण्यास स्पष्टपणे नकार दिला. मग मात्र वाल्या पुरताच घाबरला. धावत येऊन त्याने “महाराज, क्षमा करा’ असे म्हणत आधी नारदांना मुक्त केले. नंतर तो त्यांचे पाय धरून त्यांना म्हणू लागला, “मुनी,मला या पापातून मुक्त होण्याचा, पापक्षयाचा, पुण्य पदरी पडण्याचा मार्ग दाखवा.”

तेव्हा नारद वाल्याला म्हणाले, “वाल्या,खरंच जर तुला केलेल्या पापाचा पश्चात्ताप झाला असेल,खरोखरच जर तुला पापमुक्त व्हायचं असेल; तर एक कर, तू रामनामाचा जप कर.” लोकांना नेहमी तोंडाने ‘मरा…. मरा’…. म्हणणारा अन् खरोखरच त्यांना मारणारा वाल्या तो! त्याच्या तोंडात ‘राम राम’…. हा शब्द तरी कसा येणार? तरीही आता खरोखरच पापाने भ्यायलेला वाल्या एका दृढ निश्चयाने नारद मुनींना वंदन करून ‘राम राम’ असे न म्हणता ‘मरा मरा’ असे म्हणू लागाला.

त्या मरा मराचेच पुढे राम ह्या सिद्धमंत्रात रूपांतर झाले. अनेक वर्षे वाल्याने तप केले आणि त्या तपाने वाल्याचे पाप जळून गेले. त्याच्या वागणुकीत,वर्तणुकीत, आणि आचारविचार ह्यांत एक उत्तम परिवर्तन झाले. सदाचार, सद्भक्ती अन् सद्वर्तन अन् रामनाम स्मरणाच्या उपासनेने वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. ह्या वाल्मिकी ऋषींनीच पुढे ‘रामायण’ हा आदर्श ग्रंथ लिहिला.

तात्पर्य – पापाचरण करू नये. वाईट वागू नये. पापांच्या अनंत राशी जाळून टाकण्याचे अलौकिक सामर्थ्य हे फक्त ईश्वर-नामातच आहे, हे विसरू नका.

Leave a Comment