विलक्षण कसोटी

जमदग्नी आणि रेणुका ह्यांचे पाचही पुत्र मोठे मातृ-पितृभक्त होते. आई वडिलांच्या आज्ञेचं ते पालन करीत. त्या आज्ञेचा आदर करीत. त्यांचा शब्द हा शिरोधार्य मानीत…. पण, ती आणि तशी आज्ञा आपल्याला आपले पिताजी करतील, असे त्यांना कधी स्वप्नातही वाटले नव्हते. रेणुका-जमदग्नींची पत्नी ही एक महान पतिव्रता होती. ती रोज नदीवर जायची, तिथं वाळूची एक घागर तयार करायची अन् त्या घागरीत जमदग्नींच्या देवपूजेसाठी पाणी भरून घेऊन यायची.

एक दिवस मात्र काय झालं! सती रेणुका ही नदी तीरावर गेली. ती नेहमीप्रमाणे काठावर वाळूची घागर बनवीत असताना तिथे नदीच्या पात्रात चित्ररथ नावाच्या एका गंधर्वाला आपल्या प्रियतमेबरोबर जलक्रीडा करताना पाहिलं…. अन् …. कधी नव्हे ते रेणुकेचे मन ते दृश्य पाहून क्षणिक विचलित झाले. तिने मोठ्या कसोशीने मनाला आवरण्याचा प्रयत्न केला…. पण छे…. तिचे अस्थिर मन काही केल्या शांत व स्थिर होईना. अन् त्याचा परिणाम असा झाला की, तिच्या हातून वाळूची घागर काही तयार होईना.

घागर बनेना अन् तिची पावलं काही पाणी घेऊन आश्रमाकडे परतेना. त्या वेळी सती रेणुकेनं सूर्यनारायणाला प्रार्थना केली की, “हे देवा, माझ्या मनाची ही अस्थिरता दूर कर. मला पाणी घेऊन लवकर आश्रमात परत जाऊ दे. नाहीतर मला जमदग्नींच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. मला मदत कर. देवा,मला साह्य कर.” साध्वी रेणुकेनं सूर्यनारायणाला अशी कळकळीची विनंती केली.

अन् अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं. घागर बनली. तिनं चटकन् त्यात पाणी भरून घेतलं अन् ती झपाझप पावलं टाकीत आश्रमाकडे निघाली. आज पूजेला वेळेवर जल मिळालं नाहा, रेणुका अजून का परतली नाही, ह्याचा शोध जेव्हा जमदग्नी आपल्या दिव्य दृष्टीने घेऊ लागले. तेव्हा त्यांना त्या विलंबाचं कारण रेणुकेचं विचलित झालेलं मन, वारंवार मोडणारी घागर, पाणी आणायला झालेला उशीर ह्या सर्व गोष्टी कळाल्या अन् जमदग्नींचा क्रोध अनावर झाला.

तेवढ्यात आश्रमात प्रवेश करणारी रेणुका त्यांना दिसली. ते एकदम ओरडले, “थांब ! रेणुके थांब ! अगं, तू पतिव्रता ना ! तरीही तुझं मन ती गंधर्वाची जलक्रीडा पाहून अस्थिर व्हावं? त्या चित्ररथाचा विचार तुझ्या मनात यावा? थांब, एक पाऊलही पुढे टाकू नकोस. ही आश्रमाची पवित्र जागा विटाळू नकोस.’ शीघ्रकोपी जमदग्नींची आज्ञा मोडण्याचं सामर्थ्य ते कुणात असणार? त्यातून सती रेणुकेला तर ती प्रत्यक्ष पति-परमेश्वराचीच आज्ञा होती ती तिला मोडता येणं कदापि शक्य नव्हतं.

तेवढं धाडसही तिच्यात नव्हतं. ती खाली मान घालून, थरथर कापत तिथंच उभी राहिली. क्रोधावलेल्या जमदग्नींनी आपल्या पाचही पुत्रांना हाक मारली. पितृआज्ञेबरोबर जोतो धावत पुढे आला…. पण…. “मी तुमचा पिता जमदग्नी आज्ञा देतो की, तुमची माता रेणुका ही पापी, दुर्विचारी आहे. तिला प्राणदंड द्या. तिचा शिरच्छेद करा….’ पित्याची ही कठोर आज्ञा ऐकली मात्र… पण ती आज्ञा पाळून मातृहत्येचं पाप माथी कोण घेणार? चारही मुलांनी आपली मूक असमर्थता व्यक्त केली.

खाली मान घालत ते चौघेही चार पावलं मागे सरकले. राहता राहिला तो सर्वांत धाकटा पुत्र परशुराम ! “परशुरामा,पुढे हो अन् आपल्या मातेचा शिरच्छेद कर.” पित्याची ती कठोर आज्ञा ऐकली मात्र… क्षणभर त्याचेही शरीर कापू लागले. आपली माता पवित्र आहे,निष्कलंक आहे,पतिव्रता आहे, हे परशुराम मनोमनी जाणून होता. तसेच जमदग्नींचे रेणुका मातेवरचे प्रेमही त्याला ठाऊक होते. पण आता ह्या क्षणी पित्याला झालेला अनिवार क्रोध कशाने शांत होईल, हे तो विवेकी पुत्र जाणून होता. आणि म्हणूनच तो धीरानं पुढे गेला. त्याने माथा झुकवून प्रथम आपल्या मातेला विनम्र वंदन केले.

एकवार पित्याकडे मागे वळून पाहिले, डोळे मिटले अन् …. समोरचं ते भयानक दृश्य, शस्त्राचा झालेला वार…. धडावेगळं झालेलं मातेचे शिर…. अंगावर उडालेलं रक्त…. चारही भावंडांच्या गळ्यात अडलेला मातृवियोगाचा हुंदका— मातेसाठी टाहो फोडणारं त्याचं मन…. परशुरामला हे सारंसारं जाणवत होतं. पण ते सत्य उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं मात्र धाडस त्याच्या अंगी नव्हतं. तेवढ्यात पितृआज्ञेचं तंतोतंत पालन करणाऱ्या ह्या पुत्राचं कौतुक करण्यासाठी प्रत्यक्ष जमदग्नी पुढे आले.

आज्ञाधारक पुत्राला प्रेमाने, कौतुकाने जवळ घेत ते म्हणाले. “धन्य परशुरामा! तू धन्य आहेस. पितृआज्ञेचं पालन करण्यासाठी तू आज प्रत्यक्ष जन्मदात्रीवर शस्त्र उगारायला कचरला नाहीस बाळा! खरंच तू श्रेष्ठ आहेस. मी तुझ्यावर अति प्रसन्न आहे. जे हवं ते माग; मी ते देईन.” तेव्हापासून परशुरामने आपल्या पित्याकडे हीच मागणी केली की, “तात,आपण जर मला काही देणारच असाल; तर मला माझी माता रेणुका जिवंत करून द्या. मला मातृहत्येच्या पातकापासून मुक्त करा.”

बाळ परशुरामाची ती मागणी ऐकली मात्र…. प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी रेणुकेच्या | अचेतन देहाला आपल्या मंत्रसामर्थ्याने पुन्हा जिवंत केले. रेणुकेनं पती जमदग्नींना वंदन केले. आपल्या पुत्रांना मायेने जवळ घेतले. परशुराम अपराध्यासारखा मान खाली घालून दूर उभा होता. त्यालाही जवळ घेत रेणुका म्हणाली, “बाळा ! अरे, माझा तुझ्यावर जराही राग नाही. तू फक्त तुझ्या पितृ आज्ञेचे पालन केलंस एवढंच!” परशुरामाने मातेचे पाय धरले. तिने त्याला पोटाशी घेतले. एका विलक्षण कसोटीला उतरलेल्या मातृभक्तची ही कथा स्कंद पुराणात नोंद झाली.

तात्पर्य : माता-पित्याची आज्ञापालन करणे हा पुत्राचा धर्म आहे.

Leave a Comment