व्याधाची कथा

विंध्य पर्वतावर एक व्याध राहत होता. तो पारधी पणूंची व पक्ष्यांची शिकार करी. तो दुष्ट होता. अनेक प्राण्यांना जिवे मारण्याचे पाप त्याने केले होते. एके दिवशी तो पारधी शिकारीसाठी रानात गेला. त्याने धनुष्य घेतले होते. तसेच जाळेही घेतले होते. तो रानातून जात असताना वाटेत त्याला एक शिवमंदिर लागले. त्या दिवशी शिवरात्र होती. अनेक भक्त शंकराच्या दर्शनाला येत होते.

कैक भक्त टाळ आणि मृदंग घेऊन प्रेमाने शिवकीर्तन करीत होते. काही भक्त ‘हर हर महादेव’ ‘हर हर शंभो’ असा शंकराच्या नावाचा जप करत होते. त्या देवळात दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. पारधीदेखील येथे थोडा वेळ थांबला. सर्व भक्त ‘नम: शिवाय’ ‘नमः शिवाय’ म्हणत होते. ते पाहून पारध्याला हसू आले. तो मनाशी म्हणाला, ‘हे लोक किती अंधश्रद्धाळू आहेत. देवळातील शिवलिंग हा एक दगड आहे.

बाहेर खूपच दगड आहेत. मग याच दगडाला लोक ‘नमः शिवाय’ का म्हणतात?’ मनातल्या मनात तो हे म्हणत होता. मग त्याच्याही मनात ‘नम: शिवाय’ हा जप आला आणि तो अभावितपणे ‘नमः शिवाय’ म्हणू लागला. हे म्हणत असता तो शिवमंदिराला वळसा घालून अरण्यात गेला. अभावितपणे तो ‘नमः शिवाय’, ‘नमः शिवाय’ म्हणत होता. या जपामुळे त्याची पापे नष्ट होत चालेली होती. तो रानातून वणवण फिरत होता.

पण त्याला एकाही पशूची शिकार मिळाली नाही. संध्याकाळ झाली. थोड्याच वेळात काळोख पडला. तो पारधी उपाशी होता. चालत चालत तो एका सरोवराजवळ आला. सरोवराकाठी एक बेलाचे झाड होते. तो पारधी बेलाच्या झाडावर चढला. आता कोणीतरी पशू सरोवरात पाणी पिण्यास येईल म्हणून तो वाट पाहत होता. सहज चाळा म्हणून बेलाच्या झाडाची पाने तो हाताने खुडून खाली टाके. त्या झाडाखाली एक शिवलिंग होते.

बेलाची पाने त्या शिवलिंगावर पडत होती. त्या दिवशी पारध्याला उपोषण घडले. नकळत त्याने शिवमंदिराला प्रदक्षिणाही घातली. बेलाची पाने त्याच्या हातून शिवलिंगावर पडली. त्याच्या तोंडी ‘नमः शिवाय’चा जप येत होता. त्यामुळे शिवशंकर प्रसन्न झाले. तितक्यात एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवरावर आली. ती गर्भिणी होती. तिला पाहताच पारध्याने तिच्यावर बाण रोखला.

हरिणी घाबरली व मनुष्यवाणीने बोलू लागली, “हे व्याधा, मी तुझा कोणताही अपराध केलेला नाही. मी गर्भिणी आहे. असे असताना तू मजवर बाण सोडू नकोस. तुला पाप लागेल.” पारधी म्हणाला, “मी आज उपाशी आहे. मी तुझी शिकार केली नाही, तर माझ्या बायकामुलांचे पोट कसे भरेल? पण मला एक आश्चर्य वाटते. तू मनुष्यवाणीने कशी बोलतेस? तुला एवढे ज्ञान कसे मिळाले? तू पूर्वजन्मी कोण होतीस?” हरिणी म्हणाली, “देवांनी व दानवांनी समुद्रमंथन करून १४ रत्ने काढली. त्यात खूप अप्सरा निघाल्या. मी त्यातलीच एक अप्सरा आहे. माझे नाव रंभा.

मला पाहन देवांना. तपस्व्यांना मोह पडे. माझ्या शरीराच्या गंधाने ते वेडे होऊन माझ्यामागे धावत. मी इतकी लावण्यवती होते की माझी बरोबरी कोणतीही अप्सरा करू शकत नसे. पुढे मी अत्यंत गर्विष्ठ झाले. मी शंकराची पूजा-अर्चा सोडली. सोमवार, शिवरात्र ही सगळी व्रते सोडून दिली. देव मला मळीच आवडेनात. हिरण्य नावाच्या दुष्ट राक्षसाकडे जाऊन मी राहिले. मला अमृत आवडेना. त्याच्यासमवेत मी मद्य सेवन करू लागले.

एक दिवस हिरण्य राक्षस बाहेर शिकारीला गेला असता मी कैलास पर्वतावर जाऊन शंकरापुढे उभी राहिले. मला पाहताच शिवशंकर क्रोधाविष्ट झाले व मला म्हणाले, “तुला हरिणीचा जन्म येईल व तुझा हिरण्य राक्षस हरण होईल. तुझ्या मैत्रिणीसुद्धा हरिणी होतील. जा हरिणीचा जन्म घ्या.” मला खूप वाईट वाटले. मी शंकराला म्हणाले, “हे शंकरा, मला शाप देऊ नकोस. उ:शाप दे.” शंकर म्हणाले, “माझा शाप खोटा होणार नाही.

तुम्ही १२ वर्षेपर्यंत हरिणी राहाल.” त्यानंतर मी माझ्या दोन्ही मैत्रिणी व तो राक्षस यांनी हरणाचा जन्म घेतला. तो राक्षस माझा पती. माझी प्रसूती जवळ आली आहे. तू मला मारू नकोस. मी बाळाला जन्म देऊन परत तुझ्याकडे येते. नंतर तू माझे प्राण घे. तू माझ्यावर विश्वास ठेव.” व्याध आश्चर्याने त्या हरिणीकडे पाहू लागला. तो म्हणाला, “हे हरिणी, तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवील? आपला जीव वाचवावा. त्यासाठी वेळ पडल्यास खोटेही बोलावे. हा सर्वांचाच स्वभाव असतो. तू त्याला अपवाद कशी?” हरिणी म्हणाली, “मी काय केले असता तुझा विश्वास बसेल तें तू मला सांग.”

व्याध म्हणाला, “तू माझ्यासमोर शपथ घे. म्हणजे माझा विश्वास बसेल.” हरिणी म्हणाली, “मी शपथ घेते. मी जर परत आले नाही तर जगातली मोठमोठी पापे मला लागतील. मी शंकराची शपथ घेते.” व्याध म्हणाला, “ठीक आहे. तू घरी जाऊन रात्र संपायच्या आत इथे परत ये!” हरिणी म्हणाली, “हे व्याधा. मला घरी जाऊन देतो आहेस. हे तू पूर्णकर्म करतो आहेस. तू शिवपदास जाशील.” ती हरिणी पाणी पिऊन घरी गेली.

तो व्याध बेलाच्या झाडावर बसला होता. तो पुन्हा चाळा म्हणून, म्हणून बेलाची पाने तोडून टाकू लागला. ती पाने शिवलिंगावर पडत होती. व्याधाने केलेल्या पूजेने शंकर मनोमन प्रसन्न झाले. व्याधाची अनेक जन्माची पापे नष्ट झाली. व्याध तोंडाने ‘नमः शिवाय’ म्हणत होता. त्याला शिवरात्रीच्या समयी जागरणही घडले. थोड्या वेळात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी तेथे आली. व्याधाला आनंद झाला. “चला शिकार तर मिळाली.” तो मनात म्हणाला. त्याने धनुष्याला बाण लावला. तोच ती हरिणी घाबरून म्हणाली, “व्याधा, मला मारू नकोस, मला जाऊ देत.

मला पतीशी संग हवा आहे. मी पतीला रतिसुख देऊन परत येते. मी नक्की परत येते. मी जर खोटे बोलत असेन तर माथी अनेक पापे लागतील.” “तू खरेच बोलते आहेस. तू जाऊन परत ये.” ती हरिणी पाणी पिऊन निघून गेली. तोच एक मृग तेथे पाणी पिण्यासाठी आला. व्याध सावरून बसला. त्याने त्या मृगावर नेम धरला. तोच तो मृग बोलू लागला. तो म्हणाला, “हे व्याधा तू मला मारलेस तर माझ्या बायकांना खूप दुःख होईल.

म्हणून मी त्यांचा निरोप घेऊन परत येतो.” व्याधाने त्याला प्रश्न केला, “तू खरे कशावरून बोलतोस? तू शपथ घे.” मृग म्हणाला, “मी परत येईन. हे मी शपथेवर सांगतो. मी परत आलो नाही तर असंख्य पापे मला लागतील.” मृगाने शपथ घेतल्यावर व्याधाने त्याला जाऊ दिले. व्याध बेलाची पाने खुडून खाली टाकू लागला. त्यामुळे नकळतच व्याधाच्या हातून शिवपूजा घडली. त्याची सर्व पापे नष्ट झाली. सकाळ झाली.

तळ्यावर आणखी एक हरिणी आली. व्याधाने तिच्यावर नेम धरला. तो बाण ओढणार तोच ती मनुष्यवाणीने बोलू लागली. ती म्हणाली, “हे व्याधा, मला मारू नकोस. मी माझ्या पाडसाला स्तनपान करून येते.” व्याधाने तिलाही शपथ घ्यायला सांगून सोडले. हरिणी पाणी पिऊन निघून गेली. व्याध कोण केव्हा येते याची वाट पाहत झाडावर बसला होता. पहिल्या हरिणीने पाडसाला जन्म दिला.

दुसऱ्या हरिणीने पतीला संतुष्ट केले. मृग म्हणाला, “आता आपण व्याधाकडे जाऊ.” मग मृग, हरिणी व पाडस व्याधाकडे परत आले. त्यातील प्रत्येकजण व्याधाला म्हणू लागला, “मला अगोदर मार!” मृग म्हणाला, “आधी मला मार!” हरिणी म्हणाली, “आम्हांला पतीच्या आधी मार. म्हणजे आम्हांला वैधव्य येणार नाही. आम्ही पतीच्या आधी जाऊ!” पाडस म्हणाले, “आधी मला मार.”

त्यांचे बोलणे ऐकून व्याधाच्या डोळ्यातून पाणी आले. तो त्या हरणांना म्हणाला, “आज माझी सर्व पापे नष्ट झाली. माझे जीवन धन्य झाले. आता मी मुक्त होऊन शिवपद प्राप्त करीन.” असे म्हणून त्याने शिवलिंगाला भक्तिपूर्वक नमस्कार केला. तोच तेथे आकाशातून एक विमान आले. ते विमान शिवशंकराचे होते. शिवाचे तेजस्वी गण त्यात बसले होते. त्या विमानावर ते पुष्पवर्षाव करीत होते. त्या शिवगणांनी त्या सर्वांना बघताच त्या सर्वांची शरीरे तेज:पुंज दिसू लागली.

तो पारधी पंचमुखी व दशभुजांचा झाला. व्याध शिवलोकी गेला. हरिणी व त्याची पाडसे आकाशात तारकांचे पुंजके झाले. व्याध व ती नक्षत्रे अजूनही आकाशात दिसतात. स्कंद पुराणातील शिवलीलामृताच्या द्वितीय अध्यायात ही कथा व्यासांनी सांगितली आहे. ही कथा नित्य श्रवण केल्यास कथा ऐकणाऱ्याचे पाप नष्ट होते. ‘कैलासनाथ त्यांच्यावर सदैव प्रसन्न होतो.’

Leave a Comment